(मुंबई / वृत्तसंस्था)
१ ऑक्टोबर २०२६ पासून अनुदानासह घरगुती एलपीजी रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (BAA) पूर्ण केलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, अनुदानित एलपीजी केवळ खऱ्या आणि पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचावे, तसेच अनुदानित घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर, दुबार आणि अपात्र जोडण्या रोखता याव्यात, हा या प्रक्रियेचा उद्देश आहे.
ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आधीच पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे एलपीजी रिफिल पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. मात्र, ज्यांनी अद्याप प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांना अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दरात (RSP) रिफिल बुक करण्यासाठी प्रथम ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
ज्या ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण करायचे नाही किंवा ते पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यासाठीही एलपीजी मिळण्याची सुविधा कायम राहणार आहे. मात्र, अशा ग्राहकांना आपल्या संबंधित तेल विपणन कंपनीच्या डिजिटल माध्यमांवर—वेब पोर्टल, मोबाइल ॲप, WhatsApp chatbot किंवा IVRS यांसारख्या उपलब्ध माध्यमातून—आपली निवड नोंदवावी लागेल. त्यानंतर स्थानिक उपलब्धतेनुसार ५ किलो किंवा १० किलोचे घरगुती सिलिंडर बाजारभावाने, म्हणजेच अनुदानाशिवाय, उपलब्ध करून दिले जातील.
बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणासाठी ग्राहकांना तीन पर्याय उपलब्ध आहेत. सिलिंडरची डिलिव्हरी घेतेवेळी डिलिव्हरी कर्मचारी ओएमसीच्या मोबाइल ॲपद्वारे जागेवरच प्रमाणीकरण पूर्ण करू शकतो. ग्राहक आपल्या एलपीजी वितरकाच्या शोरूममध्ये जाऊनही ही प्रक्रिया करू शकतात. याशिवाय घरबसल्या संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाइल ॲपद्वारे स्वतः प्रमाणीकरण करता येते. इंडेन ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारतगॅस ग्राहकांसाठी HelloBPCL आणि HP Gas ग्राहकांसाठी HP PAY हे ॲप उपलब्ध आहेत.
सरकारी माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत २७.४३ कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून त्याचे प्रमाण ८९.९ टक्के आहे. त्यामुळे या ग्राहकांना पुन्हा कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. अद्याप प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांना १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी उपलब्ध माध्यमांपैकी कोणत्याही माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एलपीजी सेवांशी संबंधित मदतीसाठी ग्राहक १८०० २३३३ ५५५ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.


