(मुंबई / वृत्तसंस्था)
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान दररोज धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार गाडी क्रमांक १५०८७ आणि १५०८८ या दररोजच्या फेऱ्या सुरू होतील. मध्य रेल्वेने यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबर २०२६पर्यंत गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सावंतवाडी रोड येथे दुपारी १.४० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड येथून सायंकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
२१ ऑक्टोबर २०२६पासून पावसाळ्यानंतरच्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५५ वाजता सुटून सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड येथून सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल होईल.
या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
गाडीची रचना २३ एलएचबी डब्यांची असून त्यामध्ये प्रथम श्रेणीचा १ डबा, वातानुकूलित २ टियरचे २ डबे, वातानुकूलित ३ टियरचे ३ डबे, वातानुकूलित ३ टियर इकॉनॉमीचे ५ डबे, स्लीपरचे ४ डबे, सामान्य श्रेणीचे ४ डबे, १ पॅन्ट्री कार, १ पार्सल व्हॅन, १ एसएलआर/डी आणि १ जनरेटर कारचा समावेश आहे.
दरम्यान, गाडी क्रमांक १५०८८चे ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रवासासाठी आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता तसेच १० सप्टेंबर २०२६ आणि त्यानंतरच्या प्रवासासाठी सर्व फेऱ्यांचे आरक्षण ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवाशांना आरक्षणासाठी ही तारीख आणि वेळ लक्षात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दोन्ही गाड्या आठवड्याच्या सातही दिवस नियमित धावणार आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवासासाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नियमित सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळणार असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवाशांसाठीही ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
डब्यांची रचना ( एकूण २३ LHB डबे )
प्रथम वातानुकूलित (1st AC – LWFAC)
द्वितीय वातानुकूलित (2nd AC – LWACCW)
तृतीय वातानुकूलित (3rd AC – LWACCN)
तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी (3rd AC Economy – LWACCNE)
स्लीपर क्लास (Sleeper – LWSCN)
सामान्य द्वितीय श्रेणी / अनारक्षित (General Unreserved – LWS)
पॅन्ट्री कार (Pantry Car – LWCBAC)
जनरेटर/पॉवर कार (Power Car – LWLRRM)
दिव्यांगजन व लगेज व्हॅन (LSLRD)
पार्सल व्हॅन (LVPH)


