(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
मित्राच्या काकूच्या अंत्यविधीसाठी हिमायत बाग येथे गेलेला २१ वर्षीय तरुण दुचाकीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात ठार झाला. टाऊन हॉल उड्डाणपुलावर दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात सोमवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडला. एकुलता एक मुलगा गमावल्याने तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोहम्मद झिशान मोहम्मद अली (वय २१, रा. ग्लोबल कॉम्प्लेक्स, खोकडपुरा, पैठण गेट) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान बीसीए (BCA)च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि तो असे तिघेच होते. वडील दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
झिशान हा मित्राच्या काकूच्या अंत्यविधीसाठी हिमायत बाग येथे गेला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर तो मित्रांसोबत दुचाकीने (MH 20 HC 8051) भडकल गेटच्या दिशेने परतत होता. टाऊन हॉल उड्डाणपुलावर आल्यानंतर दुचाकीचा वेग अधिक असल्याने झिशानचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे तो दुचाकीवरून दूर फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
झिशानच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्र परिवाराने घाटी रुग्णालयात गर्दी केली. एकुलत्या एक मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी यावेळी प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


