(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी देण्यात येणारे मानाचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शिक्षकांच्या निवडीला अंतिम मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून प्रत्येकी एका उत्कृष्ट शिक्षकाची ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. याशिवाय संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षकाला त्यांच्या विशेष योगदानाबद्दल ‘कला पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये मंडणगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक मराठी शाळा तिडे आदिवासीवाडीचे उपशिक्षक निलेश तुळशीराम लोखंडे, दापोली तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा भरणे खोंडारणचे उपशिक्षक दिनेश कानू चिपटे, खेड तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा माणी नं. १ येथील पदवीधर विषय शिक्षक दिप्ती दिलीप यादव, चिपळूण तालुक्यातील जि. प. शाळा चिवेली वरचीचे पदवीधर शिक्षक विनोद जानू हुंबरे यांचा समावेश आहे.
गुहागर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडीचे उपशिक्षक प्रभू रघुनाथ हंबर्डे, संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पूरचे पदवीधर शिक्षक राजेश अर्जुन सावंत, रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा शिवार आंबेरे नं. २च्या उपशिक्षका रश्मी राजन वाडेकर, लांजा तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पन्हळे नं. १चे पदवीधर शिक्षक दिलीप शंकर चव्हाण आणि राजापूर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाथर्डेच्या उपशिक्षका स्नेहा सुहास काडगे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
यंदाच्या वर्षी संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा साडवली सह्याद्रीनगरचे उपशिक्षक संदेश प्रकाश झेपले यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल ‘कला पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

