(मुंबई / वृत्तसंस्था)
नीट पेपरफुटीनंतर राज्यभर चर्चेत आलेल्या MPSC परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वी तीन अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली होती. त्यानंतर नंदुरबार येथून ऋतुजा पाटील हिलाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर ऋतुजाला तीन दिवसांची, तर इतर आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा दावाही पोलिसांनी केला.
लॅपटॉप खाडीत फेकल्याचा पोलिसांचा दावा
या प्रकरणातील आरोपी MPSC अधिकारी विश्वेश्वर नकाते याने गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप खाडीत फेकल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लॅपटॉप फेकण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच लॅपटॉपमध्ये परीक्षेत विचारले जाणारे २९४ प्रश्न आणि त्यांचे पर्याय नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी खाडीतून हा लॅपटॉप शोधून काढला असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लॅपटॉपमधून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे पेपरफुटी प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
नंदुरबारमधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त
नंदुरबारमधील कौटिल्या क्लासेसचे संचालक आणि आरोपी प्रवीण पाटील यांच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयात दिली. या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींची भूमिका तपासण्यासाठी आणखी चौकशी आवश्यक असल्याने पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ऋतुजा पाटीलला तीन दिवसांची आणि उर्वरित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
‘कुठला प्रश्न परीक्षेत येणार, हे माहीत नव्हते’
आरोपींच्या वतीने वकील सत्यराम गौड यांनी पोलिसांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला. विश्वेश्वर नकाते यांचा लॅपटॉप नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परीक्षेत नेमका कोणता प्रश्न विचारला जाणार आहे, याची आरोपींना माहिती नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला.
‘ऋतुजाला प्रश्नसंच MPSCचा असल्याचे माहीत नव्हते’
ऋतुजा पाटीलने गौरवला प्रश्नसंच पाठवला होता, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली. मात्र, हा प्रश्नसंच MPSCच्या परीक्षेचा असल्याची माहिती ऋतुजाला नव्हती, असा युक्तिवाद गौरवच्या वकिलांनी केला. प्रश्नसंच २० तारखेला गौरवला मिळाला होता, असाही दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका, प्रश्नसंच नेमका कुठून लीक झाला आणि त्यामागील आर्थिक व्यवहार काय होते, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

