(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आरंक्षा यादव यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. तरुण आणि उच्चशिक्षित अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस प्रशासनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निलेश माईंनकर यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजासह कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. त्यांच्या बदलीनंतर आता पालघर येथे त्यांच्यावर नवीन प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या जागी पदभार स्वीकारलेल्या आरंक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत २०२२ मध्ये देशभरातून २०१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. मूळच्या हरियाणा राज्यातील असलेल्या यादव यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची पदवी घेतली असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यादव यांची सुरुवातीला गुजरात केडरसाठी निवड झाली होती. विवाहानंतर त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रात त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर आता रत्नागिरी उपविभागाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरासह उपविभागातील विविध भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविणे, महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तातडीने निराकरण करणे, ही नव्या अधिकाऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत. पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याबरोबरच वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील शिस्त आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये तत्पर कारवाई याकडेही नव्या अधिकाऱ्यांचे लक्ष राहण्याची अपेक्षा आहे. तरुण, उच्चशिक्षित आणि प्रशासकीय दृष्टिकोन असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागातील पोलीस प्रशासनाला नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात त्यांच्या कार्यशैलीकडे आणि कायदा-सुव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

