(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील पांडवकालीन, एकाच दगडात कोरलेल्या चाफनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. यावेळी विठ्ठल-रखुमाई वारकरी संप्रदाय, चाफवली यांच्या वारकरी दिंडीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी चाफवलीच्या चाफनाथ मंदिरात मोठी गर्दी होते. मोत्यासारखे तुषार उडवणाऱ्या धबधब्याचे आकर्षण आणि श्रावण सोमवारी चाफनाथाच्या दर्शनासह भक्तीचा आनंद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. यंदाही सोमवारी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच वारकरी दिंडीने परिसरातील भक्तिमय वातावरणात आणखी रंगत भरली.
या वारकरी दिंडीत चाफवली शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ आणि शाळा क्रमांक ३ मधील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला. हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ आणि मुखातून ‘विठ्ठल विठ्ठल’ तसेच हरिनामाचा गजर करीत ही दिंडी चाफनाथ मंदिरात पोहोचली. टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
या दिंडीत चाफवली येथील राजाराम (बुवा) भालेकर, विजय घुमे, गंगाराम (गावकर) करवंजे, काशिनाथ भातडे, किसन केसव, सीताराम दर्डी, मेघी गावातील गावकर करंबेळे, दाभोळे कोंडवाडीतील चाळके महाराज यांच्यासह आबालवृद्ध आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
चाफवली भटाचा कोंड येथील गणपत केदारी यांनी या भक्तगणांसाठी प्रसादाचे वाटप केले. भक्ती, वारकरी परंपरा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे तिसरा श्रावण सोमवार चाफवलीत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.

