(काठमांडू / वृत्तसंस्था)
नेपाळमध्ये निसर्गाने रौद्र रूप धारण केले असून रसुवा जिल्ह्यातील विनाशकारी पुरामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. तिबेट-नेपाळ सीमेजवळील भोटेकोशी आणि लेंडे नदीच्या परिसरात आलेल्या अचानक पुरामुळे गावे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, या आपत्तीत मृतांचा आकडा १६० वर पोहोचला असून ८०० हून नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे अनेक भागांमधील वाहतूक आणि संपर्क यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ३५ पूल आणि ४५ झुलते पूल वाहून गेले असून, त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेंशी परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. भोटेकोशी नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढल्याने अनेक भाग जलमय झाले. काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्लॅनेट लॅब्सच्या उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणातून रसुवागढी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून ईशान्येला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नेपाळ-चीन सीमेवर बर्फ आणि खडकांचे भूस्खलन झाल्याचे दिसून आले आहे. या भूस्खलनामुळे लेंडे नदीत हिमनदीशी संबंधित पूर आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, भोटेकोशी नदीची पाणीपातळी धोकादायक पातळीवर गेल्याने नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे आणि स्थानिक नागरिकांचा संपर्क तुटला असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, 105 भारतीय नागरिकांसह एकूण 291 परदेशी पर्यटक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतातून नेपाळला गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दिल्लीमध्ये राहणारे अनेक नेपाळी नागरिकही आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी धडपडत असून बाधित भागातून येणाऱ्या माहितीची प्रतीक्षा करत आहेत.
नेपाळमधील या महापुरामागे चीनच्या तिबेटमधील बांधकाम प्रकल्पांचा हात असल्याचा दावा काही नेपाळी पत्रकारांच्या गटाकडून करण्यात आला आहे. तिबेटमध्ये पर्वत कापणे, वसाहती आणि बंदर उभारणी तसेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहात करण्यात आलेल्या बदलांमुळे पर्यावरणावर परिणाम झाल्याचा आरोप या गटाने केला आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या आरोपांकडे सध्या दाव्याच्या स्वरूपातच पाहणे आवश्यक आहे.
या आपत्तीचा परिणाम भारतातील नागरिकांवरही झाला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिक आणि पर्यटकांच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. महाबळेश्वर येथील पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या 10 महिला पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे.
कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनमधील तिबेट येथे गेलेले पुण्यातील चार भारतीय यात्रेकरू जिलोन्ग (केरुंग) शहरात अडकले आहेत. नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने भारतात परतण्याचा मार्ग सध्या बंद झाला आहे. त्यामुळे या यात्रेकरूंसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये स्मिता पवार, योगिनी पाटील, पूजा भोसले आणि दिनेश भोसले यांचा समावेश आहे. यापैकी स्मिता पवार आणि योगिनी पाटील यांना मानसरोवर परिसरातील अतिउंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवली. दोघींना हायपॉक्सियाचा त्रास झाल्यानंतर सतत ऑक्सिजनचा पुरवठा करत त्यांना जिलोन्ग येथे खाली आणण्यात आले आहे. सध्या दोघींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिलोन्ग परिसरात वैद्यकीय सुविधा मर्यादित असल्याने दोन्ही महिलांना पुढील उपचारांसाठी काठमांडू येथे हलविणे गरजेचे असल्याचे यात्रेकरूंनी सांगितले. मात्र, पुरामुळे नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून, सीमा ओलांडण्याचा मार्ग सध्या बंद आहे. स्थानिक भागातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेलाही पुराचा फटका बसल्याने रस्ते मार्गाने यात्रेकरूंना सुरक्षितपणे स्थलांतरित करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर चारही यात्रेकरूंना जिलोन्ग येथून थेट काठमांडूला हेलिकॉप्टर किंवा अन्य उपलब्ध हवाई मार्गाने हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. चीनमधील संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने समन्वय साधून भारतीय यंत्रणांनी वैद्यकीय हवाई स्थलांतराची व्यवस्था करावी, अशी मागणी यात्रेकरूंच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शक्य तितक्या लवकर काठमांडू येथे हलवून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे यात्रेकरूंचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय प्रशासन आणि चीनमधील संबंधित यंत्रणांकडून याबाबत तातडीने काय पावले उचलली जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाच्या संकटात मदतीचा हात पुढे करत भारताने १० टन आपत्कालीन मदत सामग्री आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा नेपाळला रवाना केला आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, या कठीण प्रसंगी भारत नेपाळसोबत ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.
नेपाळमधील परिस्थिती अद्याप गंभीर असून मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचावकार्य आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


