(राजापूर / तुषार पाचलकर)
स्त्री शिक्षणापासून पूर्णपणे वंचित असलेल्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी असंख्य सामाजिक अडचणी, अपमान आणि विरोध सहन करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या त्या धाडसी आणि दूरदर्शी कार्यामुळेच आज महिला शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्र सेवा दलाचे संघटक बाबासाहेब नदाफ यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, राजापूर अंतर्गत भारत माता प्रभाग, पाचल संचलित वात्सल्य मंदिर, ओणी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचल वाडिया हाल येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबासाहेब नदाफ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कणकवली येथील ज्येष्ठ साहित्यिका सरिता पवार, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. महेंद्र मोहन गुजर, पाचल येथील महिला कार्यकर्त्या शशिताई देवरुखकर, भारत माता प्रभाग संघाच्या अध्यक्षा विनया पवार, पाचल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे, माजी सरपंच अपेक्षा मासये, पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, सहसचिव किशोरभाई नारकर, पाचल केंद्र प्रमुख अनाजी मासये, माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजू रेडिज आदी मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाईंचा वसा पुढे नेण्याचे आवाहन
ज्येष्ठ साहित्यिका सरिता पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षणाबाबत कोणतीही जागृती नसलेल्या कालखंडात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणकार्याची मुहूर्तमेढ रोवली. “स्त्री शिकली तर संपूर्ण समाज सुशिक्षित होईल” ही त्यांची ठाम धारणा होती. समाजाचा तीव्र विरोध झुगारून त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
या महिला मेळाव्याचे यशस्वी सूत्रसंचालन पाचल हायस्कूलचे शिक्षक सुशांत कविसकर यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यामुळे मेळाव्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले..या मेळाव्याच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, महिला शिक्षण व सक्षमीकरणासाठी नव्या पिढीला प्रेरणा मिळाली.

