(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरालगतच्या कुर्ली समुद्रकिनारी इंजिन बंद पडल्याने वाऱ्याच्या प्रवाहासोबत भरकटत खडकावर आदळलेल्या ‘अल रिझवान’ या मासेमारी नौकेचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला आहे. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी घटनास्थळी पाहणी करून नौकेचे झालेले नुकसान आणि दुर्घटनेची प्राथमिक नोंद केली.
कुर्ली समुद्रात मासेमारी करत असताना ‘अल रिझवान’ या नौकेचे इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्रातील वाऱ्याचा वेग अधिक असल्याने इंजिनविना नौका भरकटत गेली आणि अखेर खडकावर आदळली. त्यानंतर ही नौका किनाऱ्यावर येऊन रुतून पडली आहे. घटनेनंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडून नौकेची पाहणी करण्यात आली. त्यानुसार दुर्घटनेचा प्राथमिक पंचनामा पूर्ण झाला असला, तरी नौकेचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आलेले नाही. सध्या नौका किनाऱ्यावर रुतलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या तळाच्या भागाची पूर्ण पाहणी करणे शक्य झालेले नाही. नौकेच्या खालच्या बाजूला तडा गेला आहे का, तळाचा भाग फुटला आहे का किंवा अन्य कोणते गंभीर नुकसान झाले आहे का, हे नौका पाण्याबाहेर काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे प्राथमिक पंचनाम्यात नोंद झालेली नुकसानाची माहिती ही अंतिम नसून, नौका सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर तिची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच दुर्घटनेमुळे झालेल्या वास्तविक नुकसानीचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यात भरकटलेली नौका खडकावर आदळल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी ‘अल रिझवान’चे नेमके किती नुकसान झाले, याचे गूढ नौका पाण्याबाहेर आल्यानंतरच उलगडणार आहे.

