(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष वनविभागाच्या कासव संवर्धन मोहीम सन २०२४/ २०२५ मध्ये कासवमित्र म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मालगुंड गावचा सुपुत्र तथा कासवमित्र आदर्श नरेश मयेकर याचा नुकताच मुंबईमध्ये महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष वनविभागाच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मालगुंड येथील आदर्श नरेश मयेकर याने कांदळवनकक्ष वन विभागाच्या सन २०२४/२०२५ मध्ये कासवसंवर्धन मोहिमेत कासवमित्र म्हणून काम करताना मालगुंड गायवाडी बीचवर संरक्षण जाळी उभारताना योग्य जागेची निवड करून कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी अपार मेहनत घेतली. तसेच संरक्षण जाळ्यांमधील घरट्यांमध्ये कासवांची अंडी तयार झाल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडताना त्यांना समुद्रामध्ये अतिशय सुरक्षितरित्या सोडणे आणि किनाऱ्यावर गस्त घालून ती सुरक्षित राहण्यासाठी मेहनत घेणे याबाबतीत आदर्श ने अतिशय उल्लेखनीय सरस कामगिरी केली.
या कामगिरीची विशेष दखल घेऊन आदर्श मयेकर याचा गणेश नाईक मंत्री वने यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कांदळवन कक्ष मुंबई च्या उपवनसंरक्षक मधुमिया एस, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबईच्या एस. व्ही. रामाराव आदींसह वनविभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कासवमित्र म्हणून आदर्श मयेकर याने ही उल्लेखनीय कामगिरी करून मानाचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण मालगुंड गावातील नागरिकांकडून आणि विविध स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

