(रत्नागिरी /प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील बहीरवली भोईवाडीत कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात ६३ वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सचिन सत्यवान जुवळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोंडू जाधव यांच्या मोठ्या भावाने आरोपीच्या विरोधात यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून संशयित आरोपी सचिन जुवळे हा गुरुवारी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास मोटारसायकलवरून चंद्रकांत धोंडु जाधव यांच्या घरासमोर आला. तेथे त्याने चंद्रकांत जाधव तसेच त्यांच्या भावाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी सुरीने फिर्यादींच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार करून त्यांना दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर संशयित आरोपी सचिन सत्यवान जुवळे हा घटनास्थळावरून निघून गेला.
घटनेत जखमी चंद्रकांत जाधव यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलीस ठाणे करीत आहे.

