(राजापूर / तुषार पाचलकर)
येळवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत येळवण-धामणपे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश मालप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर सामंजस्याचे वातावरण कायम राखण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वाची असून, या पार्श्वभूमीवर मालप यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रमेश मालप यांनी यापूर्वी तंटामुक्त समितीमध्ये सदस्य म्हणून काम केले असून, समितीच्या माध्यमातून गावातील विविध प्रश्न आणि सामाजिक विषयांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या या पूर्वानुभवाचा विचार करून ग्रामसभेत त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील किरकोळ वाद, गैरसमज आणि मतभेद स्थानिक पातळीवर सामंजस्याने सोडविणे, ग्रामस्थांमध्ये आपुलकीचे संबंध निर्माण करणे तसेच गावातील शांतता व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन समितीचे काम अधिक गतिमान करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना रमेश मालप यांनी, आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीला योग्य तो न्याय देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असे सांगितले. गावातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करताना सामाजिक सलोखा आणि गावातील एकोपा टिकविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रमेश मालप यांच्या निवडीबद्दल येळवण-धामणपे परिसरातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

