(रत्नागिरी /प्रतिनिधी)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आता अरबी समुद्रावरही जाणवू लागला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील मासेमारी गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. समुद्र खवळल्याने खोल समुद्रात जाण्याचा धोका वाढला असून, मच्छीमारांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत नौका बंदरात आणून उभ्या केल्या आहेत.
बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत विविध बंदरांमधील सुमारे २०० मच्छीमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी जयगड, रत्नागिरी आणि देवगड बंदरांचा आश्रय घेतला. यामध्ये अन्य जिल्ह्यांतून आलेल्या काही नौकांचाही समावेश आहे. जयगड बंदरात सर्वाधिक सुमारे १०० नौका नांगरण्यात आल्या आहेत. रत्नागिरी बंदरात ५०, तर अन्य बंदरांमध्ये आणखी सुमारे ५० नौका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. खोल समुद्रात पाण्याचा जोरदार प्रवाह आणि वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी धोका पत्करण्याऐवजी बंदरात परतण्याचा निर्णय घेतला. समुद्र खवळल्याने उंच लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. अशा परिस्थितीत समुद्रात जाळी टाकणे धोकादायक ठरू शकते. लाटांचा जोर वाढल्यास नौकेचा तोल जाऊन दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ट्रॉलिंग तसेच पर्ससीन नेटच्या नौका सध्या बंदरातच विसावल्या आहेत.
पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मासळी मिळण्याची अपेक्षा मच्छीमारांना असते. मात्र, हंगाम सुरू होताच हवामानाने अचानक रंग बदलल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. परिणामी चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेवर सध्या पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी पाणी फेरले आहे.
हवामान सुधारण्याची प्रतीक्षा
हवामान विभागाने पाऊस आणि वाऱ्याचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे समुद्राची स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नौका बंदरातून बाहेर न काढण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. उत्पन्नासाठी समुद्रात उतरणे गरजेचे असले, तरी जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा सुरक्षित बंदरात थांबणेच मच्छीमारांनी पसंत केले आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची गर्दी दिसत असून, समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना लागली आहे.

