(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे १६ दिवसांची असून ती १६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी २२ वर्षीय आरोपी पतीविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित अशोक भुटिया (वय २२, मूळ रा. दिवळिया, जि. सुरेंद्रनगर, गुजरात; सध्या रा. रत्नागिरी) आणि पीडित मुलगी हे एकाच समाजातील आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील गणेशआळी बाजारपेठ परिसरात गणपती मंदिराशेजारी असलेल्या घरात या दोघांचा बालविवाह करण्यात आला होता. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १३ मे २०२६ रोजी गुजरात राज्यातील लकतर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. मात्र, कारवाईच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला लग्न आणि शारीरिक संबंध गुजरातमध्ये झाल्याचा खोटा जबाब दिला होता. यानंतर तिच्या भावाने आणि मावशीने समजूत काढल्यानंतर तिने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात खरी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
पॉक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील तपासासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(i), ६४(२)(m), पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९ आणि १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलिस उपनिरीक्षक आर. एस. गावीत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

