(गणपतीपुळे | वैभव पवार)
“धम्माचा केवळ अभ्यास करून चालणार नाही, तर तो प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. सतत धम्माभ्यास आणि त्याचा जीवनात सराव झाल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला आदर्श बौद्ध समाज घडू शकत नाही,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार, पाली धम्मलिपी अभ्यासक आणि ज्येष्ठ प्रवचनकार विजय जाधव यांनी केले.
बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी पौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २९ जुलै रोजी रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहारात आयोजित वर्षावास कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख प्रवचनकार म्हणून बोलत होते.
प्रवचनादरम्यान त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, बुद्ध तत्त्वज्ञान, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. धम्म संस्कार, धम्म अभ्यास आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व त्यांनी उपस्थितांना प्रभावीपणे पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित श्रामणेर आणि बौद्धाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. यानंतर बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर आणि गावशाखांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार, शिक्षण समितीचे सभापती जयवंत कदम, आरोग्य समितीचे सभापती दिनकर कांबळे, तालुका महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा रितिका जाधव, तसेच बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष भाई जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला तालुका शाखेच्या विविध उपसमित्यांचे पदाधिकारी, बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे प्रतिनिधी, विविध गावशाखांचे पदाधिकारी, महिला भगिनी, श्रामणेर, बौद्धाचार्य आणि धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष विजय आयरे यांची संस्कार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात नवनिर्वाचित अध्यक्ष विजय आयरे यांनी आषाढी पौर्णिमा आणि वर्षावास कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत विविध गावशाखांमध्ये आयोजित कार्यक्रमांना धम्म बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून ते यशस्वी करण्याचे आवाहन केले.
वर्षावासाच्या निमित्ताने बौद्धजन पंचायत समितीच्या कार्यपद्धती व गावशाखांच्या दप्तरी कामकाजाबाबत विशेष मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले. तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि चिटणीस सुहास कांबळे यांनी गावशाखांच्या प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती देत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका शाखा, संस्कार समिती, सर्व श्रामणेर, बौद्धाचार्य, गावशाखांचे पदाधिकारी आणि धम्म बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

