(रत्नागिरी)
दापोली तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समाजाच्या आरोग्य सेवेसाठी दिवस-रात्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होणे अत्यंत निंदनीय व दुर्दैवी असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा देत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करून आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. अन्यथा संघटना कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास बाध्य होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आल्याची माहिती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

