(रत्नागिरी / वार्ताहर)
दिव्यांग व्यक्तींच्या गतिशीलता, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी Hyundai Mobis यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत Mobis India Foundation, NeoMotion, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील २९ दिव्यांग लाभार्थ्यांना अत्याधुनिक NeoMotion ई-वाहनांचे तसेच अतिरिक्त बॅटरीचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचा लाभ लांजा, राजापूर आणि दापोली तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना झाला. या ई-वाहनांमुळे लाभार्थ्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार असून शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसाय आणि सामाजिक सहभागासाठी त्यांना मोठा आधार मिळणार आहे. अतिरिक्त बॅटरीमुळे अधिक अंतराचा प्रवास शक्य होणार असल्याने त्यांच्या उपजीविकेलाही चालना मिळणार आहे.
स्वावलंबी जीवनाचा संदेश
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.) श्रीमती वैदेही मनोज रानडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत NeoMotion ई-वाहनांचा प्रभावी वापर करून स्वावलंबी जीवन जगण्याचे, रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आणि आत्मविश्वासाने समाजात पुढे जाण्याचे आवाहन केले. दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद भविष्यातही सकारात्मक सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रासाठी ६० ई-वाहनांचे उद्दिष्ट
कार्यक्रमात Mobis India Foundation च्या CSR टीमच्या सदस्या श्रीमती रोशिना यांनी सांगितले की, Hyundai Mobis च्या CSR उपक्रमांतर्गत देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सहा राज्यांमध्ये एकूण ६०० NeoMotion ई-वाहनांचे वितरण करण्यात येत आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ६० वाहनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमध्ये २०, रत्नागिरीमध्ये २९ आणि उर्वरित वाहनांचे वितरण मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. त्यांनी लाभार्थ्यांना या ई-वाहनांचा प्रभावी वापर करून शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते, दीपक आंबवले, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी कृणाल देसाई यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या साक्षी चाळके, कल्पेश साखरकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
सामाजिक प्रतिनिधींचे विशेष योगदान
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये समीर नाकाडे आणि सादिक नाकाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पात्र लाभार्थ्यांची ओळख, निवड, त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये त्यांनी सक्रिय सहकार्य केले.
NeoMotion तंत्रज्ञानामुळे गतिशीलतेला नवे बळ
NeoMotion ही आयआयटी मद्रास विकसित तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रणाली असून, साध्या मॅन्युअल व्हीलचेअरचे काही सेकंदांत अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोबिलिटी वाहनात रूपांतर करते. या तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वतंत्र, आत्मविश्वासपूर्ण आणि सन्मानाने जीवन जगणे शक्य होत असून, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि सामाजिक सहभागासाठी नवे मार्ग खुले होत आहेत.
उद्योग, सामाजिक संस्था आणि शासन यांच्या प्रभावी भागीदारीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींच्या गतिशीलता, उपजीविका, स्वावलंबन आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याची भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

