(रत्नागिरी /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडल्याच्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय प्रौढावर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सात जणांविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित हे एकाच वाडीत वास्तव्यास असून, पाण्याच्या पाईपलाईनवरून त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादाचेच रूपांतर हिंसक स्वरूपात झाले असून, १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुरेश बाबू येडगे व पांडुरंग बाबू येडगे यांनी फिर्यादीला मारहाण केल्याचा आरोप आहे.
यानंतर सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे तसेच अन्य दोन ते तीन जणांनीही यात सहभाग घेत फिर्यादीला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधित सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

