(अहिल्यानगर / वृत्तसंस्था)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते NEET पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करत असताना, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिस कारवाईच्या घटना अत्यंत वेदनादायक असून, लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या घटना कोणाच्याही हिताच्या नाहीत. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनावश्यक बळाचा वापर टाळला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घेण्याची गरज’
पत्रात त्यांनी नमूद केले की, देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारे यांनी २०२४ मधील NEET परीक्षेतील पेपरफुटीचा उल्लेख करत यावर्षीही परीक्षा प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचे म्हटले. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी राजीनामा आवश्यक’
विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एखाद्या मंत्र्याचा उत्तरदायित्व स्वीकारून राजीनामा घेतल्याने सरकार कमकुवत होत नाही, उलट प्रशासनात जबाबदारीची भावना अधिक बळकट होते, असा मुद्दा अण्णा हजारे यांनी मांडला. त्यांच्या मते, खात्याच्या कामकाजात त्रुटी आढळल्यास संबंधित मंत्र्यांवरही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. यामुळे शासनव्यवस्थेतील उत्तरदायित्व वाढेल आणि प्रशासन अधिक प्रभावी होईल.
‘संवाद हा संघर्षापेक्षा नेहमीच श्रेष्ठ’
पत्रात अण्णा हजारे यांनी आंदोलनकर्त्यांशी सरकारने संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली. इतके दिवस आंदोलन सुरू असतानाही सरकारचा कोणताही वरिष्ठ प्रतिनिधी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पुढे आला नाही, ही बाब योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
लोकशाहीत संवाद हा संघर्षापेक्षा नेहमीच श्रेष्ठ मार्ग असतो. आंदोलन करणारेही देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि सकारात्मक चर्चेतून मार्ग काढणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

