( मुंबई )
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई विशेषरित्या बनवली जाते. या सर्व शाईच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुढील वाटपासाठी ताब्यात देण्यात येत आहेत.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात.
निवडणुकीच्या वेळी मतदान करताना मतदान अधिकारी मतदाराच्या बोटास विशिष्ट प्रकारची शाई लावत, ही शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावली जाते. शाई कुठल्या बोटाला लावावी, ती कशी लावा़वी, केंद्रावरील कोणत्या अधिका-याने लावावी याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. ही शाई बोटाला लावल्यावर थोड्याच वेळात सुकते आणि साधारण काही आठवडे तशीच राहते. याचा उपयोग मुख्यत्वे मतदारांनी मतदान केले आहे आणि तो दुबार मतदानासाठी येणार नाही याची खात्री करण्यासाठीच करण्यात येतो. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकून रहण्यास मदत होते.
भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार सन 1962 च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून ही शाई वापरली जाते. आता म्हैसूर पेन्ट्सकडून या शाईचे उत्पादन केले जाते. मात्र, याआधी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अर्थातच सीएसआयआर ने ही पक्की शाई तयार केली होती. न पुसता येणारी शाई तयार करण्याचा आयोगाचा विशिष्ट फॅार्म्युला आहे.त्यानुसारच शाई तयार करण्यात येते. न पुसता येणारी ही शाई शेजारच्या कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील म्हैसूर पेन्ट्स आणि वॅार्निश लिमिटेड या कंपनीकडून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार केली जाते. येथूनच देशातील सर्व राज्यातील जिल्हा निवडणूक कार्यालयांना मागणीनुसार या शाईचा पुरवठा करण्यात येतो. ही कंपनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या शाईची निर्यात देखील 30 पेक्षा जास्त देशांना करते.
शाई अशी असते, जिचा डाग लगेचच पुसता येत नाही. सुरूवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते. ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते. ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशांतही मतदानानंतर शाईने खूण करणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाई भारतातूनच जाते.
मतदान केल्यानंतर जांभळ्या रंगाची ही शाई तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट केमिकलचं प्रमाण 10 ते 18 टक्के असतं. जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही शाई लावतो, तेव्हा आपल्या शरीरातील मीठासोबत प्रक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराइड बनतं. सिल्व्हर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही, आपल्या त्वचेवर त्याची खूण राहते. बोटावर लावल्यानंतर अगदी सेकंदातच त्याची खूण उमटते आणि 40 सेकंदातच ती पूर्णपणे सुकते. विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो. तुम्ही कितीही साबण, पावडर किंवा तेल लावा, हा डाग निघत नाही. किमान 72 तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही.
सुरुवातीला ही शाई फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरीता वापरत असत. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका / सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी देखील ही शाई वापरली जाते. साधारण 80 सीसीच्या छोट्या बॅाटलमध्ये ही शाई पाठविण्यात येते. एका बॅाटलमधून साधारणत: 800 मतदारांना शाई लावता येते. प्रत्येक मतदान केंद्रावर तेथील मतदार संख्येनुसार आवश्यक तितक्या बॅाटल साहित्यासोबत पुरवल्या जातात.