(जाकादेवी / वार्ताहर)
कला शिक्षणतज्ज्ञ आणि मंथन आर्ट स्कुलचे संस्थापक शशिकांत गवळी यांची रविवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याने एक विशेष ठसा उमटवणारे, समाजाला दिशा देणारे कै.शशिकांत गवळी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. कै. गवळी यांचे जीवनचरित्र आणि कार्याचा आढावा घेतला तर संपूर्ण आयुष्य प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. सातत्याने सर्जनशीलतेत निरनिराळे प्रयोग करून एखाद्या संशोधकाप्रमाणे मंथन आर्ट स्कुल चा अभ्यासक्रम तयार केला.
दिवंगत गवळी एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व होते. पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाठी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मुकणाऱ्या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या २२ वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून शशिकांत गवळी करत होते.
मुंबईतील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, बांद्रा आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून एल. एस.रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वरळी या महाविद्यात ७ वर्ष शशिकांत गवळी यांनी अध्यापक म्हणून काम केले . कै.शशिकांत गवळी यांनी ३ हजार पेक्षा जास्त मुलांचे करिअर जाहिरात कंपनी आणि कलेच्या इतर क्रिएटिव्ह क्षेत्रात घडवले.
“कलेसाठी जीवन हे आदर्श वाटत असले तरी जीवनासाठी कला हे वास्तव आहे” या विचाराने मुंबईत एका बागेतील झाडाखाली ६ विद्यार्थ्यांना घेत सुरुवात करत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या आदर्श गुरुकुल शिक्षण पद्धतीचे हे आर्ट स्कूल आज ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचावे म्हणून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मुलांचे वय, कौशल्य, आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एक-दोन-तीन वर्षात विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील असा कल्पक अभ्यासक्रम गवळी सरांनी तयार केला. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही आणि मेहनत करायची तयारी आहे अशा अनेक विद्यार्थ्यांना सरांनी मोफत सुद्धा शिकवले. सरांचा सामाजिक दृष्टिकोन आणि तळमळ ही त्यांच्या कामातून सातत्याने दिसून येत होती.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार आणि आजपर्यंत ५७ वेळा त्यांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार मिळणे हीच यांच्या यशाच्या कल्पक दृष्टीकोनाची पावती आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणार शशिकांत गवळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित सभा मुंबई येथे रविवारी ५ रोजी मुंबईत होणार आहे.

