(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नजीकच्या पानवल येथील डॉ. सीमा मेढे-कांबळे यांची थायलंडमधील महिदोल विद्यापीठाच्या आसियान इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ डेव्हलपमेंट (ASEAN Institute for Health Development) या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आहे. अतिशय खडतर प्रयत्नांती त्यांना हे यश मिळाले आहे.
हे विद्यापीठ आरोग्य विकास, सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. डॉ. सीमा यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून गृहविज्ञान (B.Sc., Home Science) विषयात पदवी आणि पदव्युत्तर (M.Sc.,Home Science) शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर, त्यांनी थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड येथून अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान (Food Science and Technology) या विषयात उच्चशिक्षण, पीएच.डी. ही संपादन केली आहे.
डॉ. सीमा यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिक / जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण समन्वयक या पदी असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम राबविले आहेत.
डॉ. सीमा ह्या थायलंड येथील आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी थायलंड येथे पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून कार्यरत होत्या या कालावधीत त्यांनी नजीकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील तीन विद्यार्थी आणि दापोलीतील कृषी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला थायलंड येथील चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीमध्ये एम.एस्सी. या पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणाकरिता फेलोशिप आणि प्रवेश मिळण्याकरिता मार्गदर्शन केले आहे.
भारत – थायलंडमधील देवाणघेवाण वाढेल
डॉ. कांबळे यांच्या या नियुक्तीमुळे भारत-थायलंड शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला चालना मिळेल, तसेच दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील ज्ञान आणि संसाधनांची देवाण-घेवाण वाढणार आहे. त्यांच्या या शैक्षणिक आणि उज्ज्वल करियरच्या प्रवासात त्यांना वडील विजय मेढे, बहिणी मंगल, ज्योती, उमा आणि रागिणी तसेच प्रा. डॉ. बी. आर. चव्हाण, प्रा. नोपाडोन पिरारत, पती डॉ. मनोज कांबळे आणि त्यांचे कुटुंबीय यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन मिळाल्याचे डॉ. सीमा कांबळे यांनी आवर्जून सांगितले.