(रत्नागिरी)
भात पीक कापणीसाठी तयार झाले आहे. मात्र, सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात हळवे, गरवे, निमगरवे या प्रकारच्या भाताच्या वाणाची लागवड करण्यात येते. हळवे भात दसरा सणावेळीच कापणीस तयार झाले होते. परंतु, तेव्हापासूनच परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने, शेतकरी हैराण झाले आहेत.
दिवसभर कडकडीत ऊन व सायंकाळी विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत असल्यामुळे दिवसभर कापलेले भात वाळविण्यासाठी शेतावर ठेवावे लागते. परंतु, दुपारनंतर कापलेले भात बांधणीच्या वेळीच नेमका पाऊस येत असल्याने, कापलेले भात पाऊस भिजवत असून, शेतकऱ्यांना घरी नेण्यासाठी अडसर निर्माण होत आहे. पाऊस व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी भात जमिनीवर कोसळलेले आहे. हळवे भात, निमगरवे भात तयार झाले असून, गरवे तयार होण्याची मार्गावर आहेत. काही शेतकरी दुपारपर्यंत भात कापणी करून घरी नेत आहेत. पावसामुळे गवताचे नुकसान होत आहे.
भात खाचरात पावसाचे पाणी साचल्यामुळे जमिनीवर तयार कोसळलेल्या भाताला अंकुर येण्याचा धोका आहे. भात तयार झाले असताना परतीचा पाऊस कापणीसह बांधणीच्या कामाला अडसर निर्माण करीत आहे. पावसामुळे नुकसान होत असतानाच उनाड जनावरे, वन्य प्राणी भात शेतीत घुसून नुकसान करीता आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी होत आहे. शासनाने नुकसानग्रस्त भात शेतीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.