(मुंबई)
विदर्भ वगळता राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे दरवाजे आज सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुले होत आहेत. तब्बल सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येणार असून, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला जाणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. विदर्भ विभागात मात्र पावसाळी वेळापत्रकानुसार शाळांचा प्रवेशोत्सव ३० जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी
शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना फुले, पुष्पगुच्छ, चॉकलेट तसेच शालेय साहित्य देऊन स्वागत केले जाणार आहे. अनेक शाळांमध्ये आकर्षक सजावट, रांगोळी, फुगे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्याच दिवशी आनंद आणि आत्मविश्वास दिसावा, तसेच शाळेविषयी आपुलकी निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम
शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात महत्त्वाचा मानला जातो. विशेषत: इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अधिक उत्सुकता आणि थोडीशी भीती घेऊन येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना शाळेच्या वातावरणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी
यंदाच्या प्रवेशोत्सवात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षणप्रेमी विविध शाळांना भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
राज्यातील लाखो विद्यार्थी नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, शाळांमध्ये पुन्हा एकदा आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

