(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील साळवी स्टॉप परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागील बाजूस पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले तब्बल १२ गाळे आणि एक रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. विशेष म्हणजे, हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने त्याविरोधात कोणीही पुढे सरसावले नाही. त्यामुळे गाळ्यांचा खरा मालक कोण, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत राहिला आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असताना या भागातील अनेक बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात आली होती. मात्र मार्गाची सीमा निश्चित झाल्यानंतर काही स्थानिकांनी राजकीय आश्रयाचा आधार घेत पुन्हा पालिकेच्या जागेवर अनधिकृत गाळे उभारले. परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या या गाळ्यांविषयी पालिकेकडून वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. अखेर आज मालमत्ता आणि बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई करत गाळ्यांचा सपाटाच उडवला.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेत १२ गाळ्यांसह रॅम्प देखील जमिनदोस्त करण्यात आला. कारवाईदरम्यान कोणीही विरोधासाठी पुढे न आल्याने पालिकेने अत्यंत सुरळीत पद्धतीने ही मोहीम पूर्ण केली. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून हाती घेतलेली ही धडक मोहीम सध्या तरी चर्चेचा विषय ठरली आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाईबद्दल भाजपाकडून मुख्याधिकारींचा सत्कार
शहरातील कोकणनगर व साळवी स्टॉप जलतरण तलाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नगरपरिषदेने केलेल्या कारवाईचे भाजपाकडून स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी गारवे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवर देखील तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

