(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हवामान विभागाने १८ मेपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला असतानाच, रत्नागिरीत बुधवारी पहाटे अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात अनपेक्षित बदल अनुभवायला मिळाला. तालुक्यातील काही भागांत कमी-अधिक प्रमाणात हलक्या सरी कोसळल्या, तर दिवसभर आभाळ दाटून आल्याने उकाड्यात आणखी भर पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
१३ मेच्या संध्याकाळपासूनच आकाशात काळ्या ढगांची दाटी सुरू झाली होती. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (१४ मे) सकाळपासूनही वातावरण ढगाळ राहिले असून, हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिक अक्षरशः घामाघूम होत असून हवामान विभागाने गुरुवारीही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाच्या या अनपेक्षित शिडकाव्यानंतर उष्णता आणि दमटपणात मोठी वाढ झाली असून, नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. “कुलर, फॅन किंवा एसीशिवाय बसणेही कठीण झाले आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत वाढलेला चिकटपणा यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे.
मान्सूनपूर्व काळात वातावरणातील होत असलेले अचानक बदल, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे कोकणातील हवामानाचा अंदाज अधिकच अनिश्चित बनत चालल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

