( मुंबई )
देश सध्या कठीण आर्थिक आणि जागतिक परिस्थितीतून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत, संसाधनांचा मर्यादित वापर आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाचा निर्णय घेत यंदाच्या Cannes Film Festival ला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीका होत असली तरी सत्ताधारी नेते त्याला समर्थन देताना दिसत आहेत. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, “देश कठीण काळातून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
शेलार यांनी सांगितले की, पुढील काळात अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेतल्या जातील आणि संसाधनांचा कमीत कमी वापर करण्यावर भर दिला जाईल. तसेच, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपटांसाठी आवश्यक समन्वय आणि सहकार्य मात्र नियोजित पद्धतीने सुरू राहील. “मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी गरज पडल्यास मी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होईन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदींनी काय केले आवाहन?
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटावर भाष्य केले होते. भारतासारख्या देशाला मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर मोदींनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. तसेच पुढील एक वर्ष सोने-चांदी खरेदी टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा आणि अत्यावश्यक असेल तेव्हाच खासगी वाहनांचा वापर करा, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाईन मिटिंग्जच्या संकल्पनेचाही उल्लेख केला. “संसाधनांची बचत आणि इंधन वापर कमी करण्यासाठी पुन्हा एकदा व्हर्च्युअल पद्धतींवर भर देण्याची गरज आहे,” असे मोदी म्हणाले होते.
दरम्यान, मोदींच्या या आवाहनामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून आर्थिक बचत, इंधन वापर आणि वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारी स्तरावरही खर्च नियंत्रणावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

