(दापोली / वार्ताहर)
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२६, सिझन ९ सायकल स्पर्धा ९ व १० मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये स्थानिक आणि इतर जिल्ह्यातून आलेले वय ६ ते ६५ वयोगटातील १००+ स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली आसूद सालदुरे पाळंदे आंजर्ले अडखळ पाजपंढरी हर्णै दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ५० किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी खाद्यपदार्थ, मासे, आंबे, फणस, काजू कोकणी रानमेवा इत्यादींचा आस्वाद घेतला.
ही सायक्लोथॉन स्पर्धा ५० किमी कोस्टल सिनिक रुट, शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा अनेक गटात झाली. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ठराविक वेळात जास्तीच जास्त अंतर सायकल चालवण्याचे आव्हान होते. या मार्गावर आयुष शिंदे यांने १००+ किमी, स्वराज राजपूरकर, हेरंब लोंढे यांनी ८०+ किमी, अर्जुन धारसकर, सुनील शिंदे यांनी ७०+ किमी, रुद्र बडबे, श्रीराम शिंदे, मेघराज कळमकर, अश्विन गोविलकर इत्यादींनी ५०+ किमी सायकल चालवली. या सायक्लोथॉन मध्ये शॉर्ट सिटी लूप राईड पूर्ण करणारा ६ वर्षीय राजवीर कुटरेकर हा सर्वात लहान सायकलस्वार ठरला.
सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी अब्सुलूट एनर्जी ड्रिंक, राहुल मंडलिक इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, नितीन बर्वे इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.

