(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा उतारात मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून वळणावर ट्रक पलटी झाला. हा अपघात आज गुरुवारी (दिनांक १४ नोव्हेंबर २०२४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने जीवितहानी टळली असून ट्रकमधील चालक आणि क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे.
सध्या मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर अशा दोन्ही महामार्गाचे काम सुरू आहे. खोदलेल्या रस्त्यामधून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. हातखंबा हा पट्टा अपघातांचा डेंजर झोन म्हणून ओळखला जातो. मच्छी भरून गुजरात ते रत्नागिरी असा प्रवास करत होता. हातखंबा हायस्कूल जवळील अवघड वळणावर हा मच्छी भरलेला ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटला. भरलेला ट्रक थेट वळनावर पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लिनर हे दोघे ही बचावले आहेत.
या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांसह जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजच्या हातखंबा रुग्णवाहिकेचे चालक बाळा केतकर यांना मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरळीत केली. तसेच किरकोळ जखमी झालेल्या चालक क्लिनर यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी हातखंबा रूग्णालयात दाखल करण्यात आले.