(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समारंभांनी गजबजणाऱ्या या नाट्यगृहात मात्र छताच्या फॉल्स सीलिंगची स्थिती पाहता देखभाल-दुरुस्तीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छताची एका ठिकाणी फॉल्स सीलिंग उचकटल्याने दिसत असून, ती कधीही खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संभाव्य दुर्घटनेची वाट पाहण्याऐवजी नगर परिषदेने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला होता. बाह्यरूपात बदल झाला, सुविधा उभारण्यात आल्या; मात्र या सुविधांची नियमित देखभाल होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. छतावरील फॉल्स सीलिंग उचकटलेल्या दिसत असताना त्याकडे दुर्लक्ष होणे ही बाब गंभीर आहे. नाट्यगृहात कार्यक्रम सुरू असताना आवाजाच्या कंपनांमुळे किंवा अन्य कारणांमुळे फॉल्स सीलिंग शीट आणखी सैल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने छताची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासोबतच, या नाट्यगृहात संपूर्ण साउंड सिस्टीम नव्याने बसवण्यात आली आहे. मात्र, गायनाचे कार्यक्रम असल्यास ही यंत्रणा अपेक्षित परिणाम देत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे अनेकदा आयोजकांना बाहेरून स्वतंत्र साउंड सिस्टीम आणावी लागत असल्याचे चित्र आहे. मग लाखो रुपये खर्च करून नव्याने बसवलेल्या साउंड सिस्टीमचा उपयोग नेमका काय? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नाट्यगृहात आधुनिक ध्वनियंत्रणा उपलब्ध असूनही तिचा अपेक्षित वापर होत नसेल आणि आयोजकांना पुन्हा स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असेल, तर या यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी होणे आता आवश्यक आहे.
नगर परिषदेने संबंधित विभागामार्फत छताची तातडीने तांत्रिक तपासणी करून, धोकादायक सीलिंगची दुरुस्ती करावी आणि साउंड सिस्टीमची कार्यक्षमता तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी होत आहे. सावरकर नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच त्याची सुरक्षितता आणि कार्यक्षमताही टिकवली जाणार का, हा प्रश्न आता नगर परिषद प्रशासनासमोर आहे.


