(गणपतीपुळे / वैभव पवार)
सम्यक संबुद्ध समाज मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा – कारवांची वाडी यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच आदिशक्ती नगर कारवांची वाडी येथे मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त जयंती महोत्सवात सकाळ सत्रात Ad.अमित अनंत शिरगावकर यांनी पोस्को कायदा, कोणत्या केस करिता सरकारी मोफत वकील मिळतो, जन्म ते मृत्यु सरकारी यंत्रणा कशी कार्य करते आणि आवश्यक टोल फ्री नंबर या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच सायंकाळच्या सत्रात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रकाश रसाळ ( जि.प. सदस्य), सुयोग कांबळे (जि प. समाज कल्याण सभापती), गजानन धनावडे (पंचायत समिती उपसभापती) यांचा मंडळाकडून जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सत्रात निलेश पवार ( सिने अभिनेते, चळवळीचे अभ्यासक ) यांनी अतिशय सुंदर व्याख्यान दिले. राज्यघटनेची प्रस्तावना, त्यातील प्रत्येक शब्द ,भारतात राहणार्या गरीब श्रीमंत यांना समान न्याय, अधिकार, बंधुता व जातीय समानता, मी प्रथम व अंतिमतः फक्त भारतीय आहे तसेच नवीन पिढी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांना कोणते बाबासाहेब ऐकायला, वाचायला आवडेल ते पटवून सांगितले, अतिशय प्रखरपणे आपले विचार मांडले, आपल्या व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून विचार करायला भाग पाडले.
या अशा भरगच्च कार्यक्रमात मुलांची भाषणे, सभासदांचे मनोगत, फनीगेम, स्नेह -भोजन आणि सर्वात आकर्षण होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणुक. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांची ध्यानात बसलेली, चलचित्रे स्थानिक कलाकारांनी सादर केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या रात्रीच्या सत्रात प्रबोधन पर कव्वालीचा कार्यक्रम सादर करण्यात आला,
हा संपुर्ण कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष बळीराम गवई आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुष्का मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी सभासद, तरुण मित्र वर्ग यांनी अतोनात मेहनत घेतली. शेवटी आभार आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

