(ठाणे)
ठाणे स्टेशन परिसरात शिवशाही बसला लागलेल्या भीषण आगीत मोठा अनर्थ टळला. बसमधील 15 प्रवासी चालकाच्या प्रसंगावधानामुळे वेळीच बाहेर पडल्याने सर्वजण सुखरूप बचावले. मात्र काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून वापीकडे जाणारी शिवशाही बस ठाण्याहून बोईसरकडे निघाली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच बसच्या इंजिन आणि डिझेल टाकीजवळून धूर निघू लागला. परिस्थिती ओळखून चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. घाईगडबडीत एका महिला प्रवाशाची बॅग बसमध्येच राहिली. त्या बॅगेत सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने असल्याने ती चिंतेत होती. दरम्यान, आगीने काही मिनिटांतच संपूर्ण बस भस्मसात केली.
घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आग विझल्यानंतर त्यांनी जळालेल्या बसमध्ये आणि राखेत शोधमोहीम राबवली. आश्चर्यकारकरित्या, दागिने वितळण्यापासून वाचले आणि सुरक्षित बाहेर काढण्यात जवानांना यश आले. जळालेल्या बसमधून सोने सुरक्षित मिळाल्याने महिला प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि अग्निशमन दलाचे आभार मानले.
या घटनेमुळे ठाणे स्टेशन परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

