(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
भारतीय घटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील समाज कल्याण विभागाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून, रात्रीच्या वेळी या भवनाचे रूप विशेष उठून दिसत आहे. निळ्या आणि विविधरंगी प्रकाशझोतांनी नटलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, परिसरात उत्सवी वातावरणाची अनुभूती निर्माण होत आहे.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना समाज कल्याण विभागानेही आपल्या इमारतीच्या सजावटीतून अभिवादन करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. संध्याकाळनंतर रोषणाईने उजळून निघालेली ही इमारत पाहण्यासाठी नागरिकांची पावले आपोआपच या ठिकाणी वळताना दिसत आहेत.
दरम्यान, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून दिपक घाटे हे सध्या कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आंबेडकरी जयंतीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

