( दापोली )
दापोली तालुक्यातील दापोली–लाडघर मार्गावर आज (बुधवार, ८ एप्रिल) रोजी सकाळी भीषण अपघात घडला. चंद्रनगर उतार परिसरात एक रिक्षा सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याने तिघेजण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभुआळी येथील चंद्रकांत खंडाळे यांच्या मालकीची रिक्षा लाडघरकडे जात होती. चंद्रनगर येथील तीव्र उतारावरून खाली उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून त्यांनी रिक्षेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत धाडसी बचावकार्य केले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत मदत मिळाली.
या अपघातात शामल चंद्रकांत खंडाळे (वय ३८) आणि विकास बाळाराम बैकर (वय ३९) हे जखमी झाले असून, त्यांच्यासह आणखी एक जखमी आहे. सर्वांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे दापोली–लाडघर मार्गावरील धोकादायक उतार पुन्हा चर्चेत आले आहेत. या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

