(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी आता नागरिकांच्या दैनंदिन गरजांनाही लक्ष्य करत फसवणुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. Mahanagar Gas Limited (महानगर गॅस) कंपनीच्या नावाखाली फोन करून ग्राहकांना गंडा घालण्याच्या घटना समोर येत असून, साताऱ्यानंतर ही टोळी रत्नागिरीतही सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात, रत्नागिरीतील नागरिकाला अशाच प्रकारे सुमारे सहा हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भामटे स्वतःला गॅस कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करतात. “तुमचे गॅस बिल अपडेट झालेले नाही, त्यामुळे तुमचे कनेक्शन तत्काळ बंद करण्यात येईल,” अशी भीती दाखवून ते ग्राहकांना गोंधळात टाकतात.
सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकही या दबावाखाली येतात. यानंतर, “फक्त सात रुपये भरून कनेक्शन सुरू ठेवा,” असे आमिष दाखवत ग्राहकांना व्हॉट्सऍपवर ‘APK’ फाईल पाठवली जाते. ही फाईल डाउनलोड करताच संबंधित व्यक्तीचा मोबाईल पूर्णतः हॅक होतो. त्यानंतर मोबाईलमधील संदेश, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती चोरट्यांच्या हाती लागते. काही मिनिटांतच खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. यापूर्वी सातारा जिल्ह्यात अशाच प्रकारच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. आता या टोळीने रत्नागिरीतही आपले जाळे पसरल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोणतीही गॅस कंपनी फोनवरून अशा प्रकारे पैसे भरण्याची मागणी करत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक किंवा ‘APK’ फाईल्स डाउनलोड करू नयेत, तसेच अल्प रकमेचे आमिष दाखवून बँक तपशील मागितल्यास त्वरित सावध व्हावे, असे पोलिसांनी नमूद केले आहे. मोबाईल हॅक झाल्याचा संशय आल्यास त्वरित इंटरनेट सेवा बंद करून सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे..

