(रत्नागिरी)
गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर दिवशी चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवत एका तरुणाने महिलेला तब्बल २० लाख ८२ हजार ९ रुपये इतक्या रक्कमेला फसवल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगांव पोलिस स्थानकात संशयित म्हणून सचिन चांगदेव येळवी (३६, खेडर्डी) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद एका महिलेने दिली आहे. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दर दिवशी चांगला परतावा देतो, असे सचिन येळवी याने सदर महिलेला सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून या महिलेने ७ जुलै २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत घरातून वेळोवेळी गुगल पे, चेक अशा स्वरुपात एकूण २२ लाख ६६ हजार २३४ रुपये इतकी रक्कम दिलेली आहे.
त्यापैकी १ लाख ८४ हजार २२४ रुपये इतकी रक्कम येळवी याने त्या महिलेला परत दिली आहे. तसेच २० लाख ८२ हजार ९ रुपये इतकी रक्कम परत दिलेली नाही. पैसे परत मिळत नाहीत आणि त्याबाबत उत्तरेही नीट मिळत नाहीत, म्हणजे आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच या महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार सचिन येळवी याच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.