( मुंबई )
राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी अजूनही अनेक ठिकाणी अशा प्रकरणांचा पर्दाफाश होत आहे. माहितीच्या अभावामुळे अनेक नागरिक उपचारासाठी डॉक्टर म्हणून स्वतःला सांगणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात. यामुळे अनेकदा रुग्णांची फसवणूक होते आणि काही प्रकरणांत जीवितहानीही होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली.
नवी मुंबईत बनावट उपचारामुळे तरुणीचा मृत्यू
दरेकर यांनी सभागृहात सांगितले की, नवी मुंबई मधील वाशी येथे वैद्यकीय पात्रता नसलेल्या एका वॉर्डबॉयच्या निष्काळजीपणामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. सदर वॉर्डबॉय अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये काम करत असून तो स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णांवर उपचार करत होता. मृत तरुणीच्या वडिलांनी मुलीवर उपचार करण्यासाठी त्याला घरी बोलावले होते. त्याने तपासणी करून इंजेक्शन दिले. मात्र इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर पुन्हा इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.
या वॉर्डबॉयने यापूर्वीही अनेक रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्यातील विविध भागांत रुग्णालये आणि लॅबमध्ये बोगस डॉक्टर व बनावट टेक्निशियन आढळल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत, असे दरेकर यांनी सांगितले.
सोलापूरमध्ये फिरते गर्भलिंग निदान केंद्र
दरेकर यांनी पुढे सांगितले की जामगाव तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे फिरते गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आले आहे. त्यामुळे पदवीधारक आणि बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी Maharashtra Medical Council यांनी सुरू केलेली ‘नो युवर डॉक्टर’ मोहीम प्रभावी ठरत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव
ग्रामीण भागात शहरी भागासारख्या तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व औषधांचा अभाव आहे. यामुळे नागरिकांना बोगस डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांची माहिती असूनही अनेकदा कारवाई होत नाही, असेही दरेकर यांनी सभागृहात सांगितले.
विशेष मोहीम राबवण्याची मागणी
राज्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. आरोग्य व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी अशा बनावट डॉक्टरांवर तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

