( मुंबई )
राज्यातील मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कडून ‘शाळा आपल्या दारी’ आणि ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. मार्च ते जून 2026 या कालावधीत ही राज्यव्यापी मोहीम राबवली जात असून, जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुवर्णकाळ मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे.
खाजगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेमुळे सरकारी शाळांमधील प्रवेश घटत असल्याची नोंद घेत राज्यस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानुसार शाळांमध्ये आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभियानातून गावपातळीवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती केली जाणार आहे. यासाठी विशेष गीत तयार करण्यात आले असून, शाळांमधील सुविधा घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.
‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमाचे वैशिष्ट्य
या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध सुविधा:
- स्मार्ट टीव्ही व डिजिटल शिक्षण
- मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके
- पोषण आहार योजना
यामुळे पालकांचा विश्वास वाढवून सरकारी शाळांकडे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘माता-पालक मेळावे’ आयोजित करण्यात येणार असून, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पालकांचा सक्रिय सहभाग वाढवला जाणार आहे.
ग्रामपातळीवर नवकल्पना
ग्रामपंचायतींमार्फत आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देणाऱ्या पालकांना काही ठिकाणी करसवलतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच ‘शिक्षणाची वारी’, ‘ग्रंथदिंडी’ आणि ‘चावडी वाचन’ यांसारख्या उपक्रमांतून संपूर्ण गाव शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्न होणार आहे.
मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि प्रगत शिक्षण मिळावे, हे शासनाचे ध्येय आहे.” ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट क्लास आणि सेमी-इंग्रजीसारख्या सुविधांनी सुसज्ज केले जात असून, या मोहिमेमुळे सरकारी शाळांचे वैभव पुन्हा मिळवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे केवळ पटसंख्या वाढणार नाही, तर शिक्षणाची गुणवत्ता आणि पालकांचा विश्वासही मजबूत होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

