( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत आंबेडकरी विचारांचा सांस्कृतिक जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. रत्नागिरी बुद्धिस्ट पत्रकार संघटनेच्या वतीने भव्य जलसा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतून सामाजिक जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता, प्रज्ञा, शील आणि करुणा या मानवी मूल्यांचा समाजात प्रसार व्हावा तसेच आंबेडकरी विचारांचे सांस्कृतिक माध्यमातून प्रभावी सादरीकरण व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या जलसा परंपरेला चालना देण्याचा या स्पर्धेमागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. ही भव्य जलसा स्पर्धा दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार असून स्पर्धेचा प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,७७७ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ४,४४४ रुपये व मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसांचीही तरतूद करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून पहिले १२ संघ सहभागी होऊ शकणार आहेत. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०२६ असून इच्छुक संघांनी ९६७३१३८५१० किंवा ९१७२९१६६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी बुद्धिस्ट पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
नक्की वाचा : जलसा स्पर्धेची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा.

