(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला संगमेश्वर येथील जाखमाता व निनावी देवीचा पारंपरिक ‘शिंपणे’ अर्थात रंगपंचमी उत्सव यंदा बुधवार, १८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संगमेश्वरसह कसबा परिसरात हा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने पार पडत असून सध्या त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
राज्यात इतर ठिकाणी ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते, त्या दिवशी संगमेश्वरात हा उत्सव होत नाही. येथे फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर बलिदानासाठी योग्य दिवस पाहून ‘शिंपणे’ उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी हजारो भाविक संगमेश्वरात एकत्र येऊन देवीचे दर्शन घेत उत्सवात सहभागी होतात.
उत्सवाच्या दिवशी दिवसभर लाल रंगाची उधळण करत देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो. भाविक देवीला नवस म्हणून नारळ, कोंबडे व बोकड अर्पण करतात. त्यानंतर त्या अर्पणातून तयार केलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. रात्री मटण-भाकरीच्या प्रसादाने या पारंपरिक सोहळ्याची सांगता होते. उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हे भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतात.
सर्वधर्म समभाव आणि पारंपरिक संस्कृतीची जपणूक करणारा हा उत्सव असल्याने माहेरवाशिणीही मोठ्या संख्येने गावात येतात आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
या उत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष व मानकरी दत्ताराम उर्फ बावा सुर्वे यांनी केले आहे.

