(मुंबई)
राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9 लाख 84 हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला. ही मोहीम विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग या गंभीर आजारापासून मुलींना संरक्षण देण्यासाठी राबवली जात असून त्यासाठी Human Papillomavirus Vaccine (एचपीव्ही लस) दिली जाणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य वयात घेतलेली ही लस भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकते.
“प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” – एकनाथ शिंदे
या मोहिमेच्या उद्घाटनावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेली आहारपद्धती आणि वाढता तणाव यामुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. एचपीव्ही लसीकरण ही त्याच दिशेने टाकलेली मोठी आणि स्तुत्य पावले आहेत.”
‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ मोहिमेची आठवण
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या उपक्रमाचा उल्लेख करताना शिंदे यांनी सांगितले की, त्या मोहिमेत सुमारे 3 कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान जवळपास 10 हजार महिलांमध्ये कर्करोगाचे प्रारंभिक निदान झाले होते. आजार सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यामुळे अनेक महिलांचे प्राण वाचवणे शक्य झाले, याचा खरा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
मेमोग्राफी तपासणीसाठी फिरत्या गाड्या
राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी मेमोग्राफी तपासणीची सेवा गावागावात पोहोचवण्यासाठी आठ विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 2 कोटी 91 लाख महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. गरज भासल्यास अशा गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करेल. यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC), जीएसआर आणि राज्याच्या आरोग्य बजेटमधून निधी उपलब्ध करण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर
राज्यातील अनेक रुग्णालयांच्या इमारती सध्या 60 ते 70 टक्के पूर्ण झाल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासाठी कमी व्याजदरात निधी उपलब्ध व्हावा म्हणून एडीबी आणि वर्ल्ड बँकसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच Public Private Partnership (PPP) मॉडेलद्वारे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. नामांकित संस्थांच्या सहकार्याने आधुनिक आरोग्य सुविधा उभारून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
‘आरोग्य आपल्या दारी’ संकल्पना
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, या मोहिमेमुळे सुमारे 5 कोटी नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळाला. आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली असून आरोग्य सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला जाणार आहे.
दुर्गम भागात आरोग्य सेवा मजबूत करण्याचा निर्धार
आरोग्यमंत्री असताना दुर्गम भागात केलेल्या दौऱ्यांचा अनुभव सांगताना शिंदे यांनी राज्याच्या सीमावर्ती आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. काही दुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच मंत्री पोहोचल्याचे स्थानिकांनी सांगितल्याचा अनुभव त्यांनी यावेळी शेअर केला. या पार्श्वभूमीवर दुर्गम आणि आदिवासी भागात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

