(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कोकणात सध्या शिमगा उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक सोहळ्यांचे वातावरण दाटले असतानाच जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपानाच्या वादामुळे सणाच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, “ज्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात अडचणी निर्माण होत असतील, त्या गावांनी तात्काळ पोलीस बांधवांशी संपर्क साधावा. जिल्हा पोलीस दल आपल्या सोबत उभे राहील,” असे आवाहन नितीन बगाटे यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक B. B. Mahamuni उपस्थित होते.
बगाटे म्हणाले, शिमोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. तरीही काही गावांमध्ये मानपानाच्या वादावरून तक्रारी प्राप्त होत आहेत. या वादांमुळे गावातील आनंद, एकोपा आणि सणाची परंपरा बाधित होत आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे.
उत्सव हा समाजातील सलोखा, ऐक्य आणि परंपरेचा उत्सव असल्याचे अधोरेखित करत त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. “ज्या गावांमध्ये मानपानाच्या वादामुळे शिमगा साजरा करण्यात अडथळे येत असतील, तेथील नागरिकांनी पुढाकार घेऊन संवाद साधावा. तरीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस बांधवांना फोन करा. जिल्हा पोलीस दलातील आपले अधिकारी व कर्मचारी उत्सवात सहभागी होतील आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांना केवळ कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकीही असल्याचे नमूद करत बगाटे म्हणाले, एक सामाजिक सद्भावना म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस सदैव आपल्या पाठीशी आहे. आपला शिमगा उत्सव आनंदात, शांततेत आणि परंपरेप्रमाणे साजरा व्हावा, हीच आमची भूमिका आहे.
मानपानाच्या वादांवर संवाद आणि समन्वयातून तोडगा काढत शिमग्याचा जल्लोष अबाधित ठेवण्याचे आवाहन करत जिल्हा पोलिसांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सणाचा आनंद कायम ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

