(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे पार पडले.
हा लोगो अनावरण सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद, रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी ग्रामीण, कृषी आणि सहकार या ग्रामीण जीवनाशी थेट निगडित तीन विषयांवर आधारित साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याचे सांगत, या ऐतिहासिक साहित्य पर्वाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यप्रेमींना केले.
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मालगुंड गावच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर होणाऱ्या या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनासाठी सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुन्हा एकदा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी केले. लोगो अनावरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, लेखक व मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

