(नवी दिल्ली)
कार घरात उभी असतानाही मोबाईलवर अचानक FASTag टोल कापल्याचा मेसेज येणे अनेक वाहनधारकांच्या बाबतीत घडले आहे. आता ही गंभीर चूक अधिकृतरीत्या मान्य करण्यात आली असून, नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने 2025 मध्ये सुमारे 18 लाख प्रकरणांत चुकीची FASTag टोल वसुली झाल्याची कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांना रक्कम परत करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या चुकीच्या व्यवहारांपैकी सुमारे 35 टक्के प्रकरणांत संबंधित वाहने टोल प्लाझावर गेलीच नव्हती, तरीही FASTag खात्यातून पैसे वसूल झाले होते.
FASTagमध्ये चूक कशी झाली?
सरकारी माहितीनुसार, बहुतांश प्रकरणांत ही गडबड टोल प्लाझावरील मॅन्युअल एंट्रीमुळे झाली. तांत्रिक अडचणींमुळे जेव्हा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर प्रणाली काम करत नाही, तेव्हा टोल कर्मचारी वाहन क्रमांक हाताने प्रणालीत नोंदवतात. या प्रक्रियेत चुकीचा वाहन क्रमांक टाकल्यास दुसऱ्या वाहनधारकाच्या FASTag खात्यातून पैसे कापले जातात.
लोकसभेत सरकारचा लेखी खुलासा:
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 2025 मध्ये 17.6 लाख चुकीच्या FASTag व्यवहारांची नोंद केली असून, त्यानंतर संबंधित रक्कम परत करण्यात आली आहे. हे व्यवहार एकूण 464 कोटी FASTag व्यवहारांपैकी केवळ 0.03 टक्के असले, तरी वाहनधारकांच्या विश्वासाशी संबंधित असल्याने हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मॅन्युअल एंट्री बंद करण्याचा विचार:
FASTag संदर्भातील तक्रारी सोशल मीडिया आणि ग्राहक मंचांवर सातत्याने समोर येत होत्या. यावर उपाय म्हणून टोल प्लाझावर वाहन क्रमांकाची मॅन्युअल एंट्री पूर्णपणे बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. यामुळे भविष्यात चुकीची टोल वसुली आणि नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
वेळ वाचला, पण तक्रारी वाढल्या:
सरकारच्या माहितीनुसार, FASTag लागू झाल्यानंतर टोल प्लाझावर लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. FASTagपूर्वी सरासरी 12.2 मिनिटे लागायची, तर आता केवळ 40 सेकंद लागतात. दरम्यान, 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींत राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून 50,195 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन झाले आहे. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात हे कलेक्शन 61,508 कोटी रुपये होते.
FASTag वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट:
FASTag व्यवहारांसाठी एसएमएस किंवा अॅप अलर्ट सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ICICI, HDFC, Kotak किंवा My FASTag अॅपमध्ये लॉग इन करून सेटिंग्स किंवा नोटिफिकेशन विभागात ट्रान्झॅक्शन आणि लो-बॅलन्स अलर्ट सुरू करा. किमान बॅलन्स मर्यादा सेट करा आणि FASTagशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय आहे याची खात्री करा.
मिस्ड कॉलने बॅलन्स तपासा:
अॅपमध्ये अडचण असल्यास, FASTag जारी करणाऱ्या बँकेच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून अलर्ट सुरू करता येतात. काही बँका मिस्ड कॉलद्वारेही FASTag बॅलन्सची माहिती देतात. वाहनधारकांनी सतर्क राहणे हाच चुकीच्या वसुलीपासून बचावाचा प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

