(कळझोंडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी फाटा क्रमांक २ समाजसेवक गोविंद गोजू पवार मार्ग ते तिसंग मार्ग अखेर सेवाभावी कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर डांबरीकरणाला प्रारंभ झाला असून गाववासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबाबतचे वृत्त असे की गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्थाच नव्हे तर अक्षरशः चाळण झाली होती.अनेक वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत होता. एप्रिल २०२५ मध्ये एम.आय.डी.सी. (सी.आर.एस) फंड अंतर्गत सदर कळझोंडी फाटा क्र.२ ते तिसंग गोविंद गोजू पवार मार्ग हा डांबरीकरणासाठी नामदार उदय सामंत यांनी मंजूर केला होता. या रस्त्यावर पावसापूर्वी बारीक खडीही टाकण्यात आली होती.ती पावसाळ्यात वाहून गेली. परंतु याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने वारंवार एम.आय.डी.सी.खात्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
तसेच कळझोंडी गाव जनांदोलन समितीचे प्रमुख महादेव आग्रे, संदीप पवार, पांडुरंग सनगरे यांनी सदर रस्ता डांबरीकरण होण्यासाठी एम.आय.डी.सी. कार्यालय रत्नागिरी येथे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ता लवकरच डांबरीकरण करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता.
सदर मागणीकडे संबंधित खात्याने दुर्लंक्ष केल्यामुळे खंडाळा पंचक्रोशी सामाजिक कार्यकर्ते व संविधानिक लोकशाही मार्गाने जनांदोलन उभे करणारे लढवय्ये युवक नेते प्रथमेश गावणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर रस्ता लवकरच डांबरीकरण करण्यात यावा याबाबत बैठक केली होती. तरीही काही हालचाल संबंधित खात्यांकडून दिसून आली नाही. तेव्हा श्री प्रथमेश गावणकर यांनी या रस्त्याबाबतची झाली दुरावस्था याबाबतचे वास्तव वृत्त व्हिडिओच्या माध्यमातून शासन प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रसिद्ध केले होते.
सदर व्हिडिओची दखल घेऊन शासन प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी २० जानेवारी पासून कामकाजाला दमदार सुरुवात केली असून कळझोंडी गावातील लोकांनी या डांबरीकरणाबाबत अतिशय समाधान व्यक्त केले आहे.
कळझोंडी गावातील या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे यासाठी अतिशय मोलाचे योगदान देणारे युवक नेतृत्व प्रथमेश गावणकर यांचे कळझोंडी जन आंदोलन समितीच्या वतीने अभिनंदन होत आहे.

