(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खंडाळा मार्गावर आज (गुरुवार, दिनांक 15 जानेवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका वृद्धाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. लोळू हरिश्चंद्र राठोड वय वर्षे ७० असे या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी मुरुगवाडा येथे लोळू हरिश्चंद्र राठोड हे राहत होते. ते ठेकेदार म्हणून काम करीत असत. आपल्या ताब्यातील एम एच ०८ बीजी 7047 ही दुचाकी घेऊन ते आपल्या कामाच्या निमित्ताने रत्नागिरीहून खंडाळ्याकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी वरवडे खंडाळा मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करीत असताना त्यांना वरवडे ते खंडाळा मार्गावर अचानकपणे चक्कर आल्यासारखे जाणवले. यावेळी त्यांनी आपली दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते दुचाकीवरून खाली पडले.
त्यांच्या पाठीमागे दोन महिला बसल्या होत्या. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली. मात्र दुचाकीवरून खाली पडलेल्या लोळू राठोड यांना तात्काळ खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास अधिक जयगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपिसे हे करीत आहेत.

