(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यात खासगी सावकारीचा अक्षरशः आगडोंब उसळल्याची जोरदार चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागत असल्याची ठिकठिकाणी दबक्या आवाजात चर्चा होत आहे. मात्र, सावकारांच्या व त्यांनी पोसलेल्या पोट एजन्टाच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणी धाडस करत नसल्याचे चित्र आहे.
सावकाराला शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच कर्ज द्यावे लागते. मात्र, शासनाने ठरवून दिलेला नियम धाब्यावर बसवून थेट दामदुप्पट दराने व्याज आकारले जात आहे, अशी चर्चा आहे. नोंदणीकृत सावकारांवर सहाय्यक निबंधकांची नजर राहते. मात्र, नोंदणी न करता कर्ज दिले जात असेल तर, त्याला अवैध सावकारी संबोधले जाते. असे सावकार अवाच्यासव्वा व्याज घेऊन अनेकांचे जीणे मुश्किल करत असतात. सावकारी पाश हा गळ्याभोवती पडलेल्या फाशीच्या विळख्याहून भयंकर असतो असं म्हटलं जातं. सावकाराच्या जाचाने लोकांचं, त्यांच्या कुटुंबीयाचं जीवन हे असह्य झाल्याची काही उदाहरणं आहेत. अशा प्रकरणात कर्ज देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, भीतीपोटी अवैध सावकारीविरुद्ध तक्रार देण्यास पुढे कोणी येत नसल्याने अशा सावकारांवर पोलिस कारवाई होत नाही. अनेकवेळा दहशतीखाली तशी तक्रार कुणी देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही असे दिसून येत आहे.
एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते. परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी, यासह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पतसंस्थेकडे जाते. परंतु पत नसल्यामुळे तेथेही कर्ज मिळत नाही. पतसंस्थेतही निभाव न लागल्यास व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. अशावेळी त्या व्यक्तीला सावकारी अधिक योग्य वाटते, व तिथेच त्याची पिळवणूक सुरू होते. अनेकवेळा या जाचाविरोधात कुठे दाद मागायची, कुठे तक्रार अर्ज करायचा, काय करायचं हेच माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तीसमोर अडचणीचा डोंगरच उभा राहतो. गरजेपोटी घेतलेलं कर्ज हे अक्षरशः आपल्या मरणाचं कारण बनलंय अशी जाणीव त्या व्यक्तीला होऊ लागते.
ओळखीवर कर्ज देण्यासाठी तसेच दिलेले कर्ज व्याजासह वसूल करण्यासाठी सावकारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्याचेही चेर्चेतून समजते आहे. या टोळ्या वसुलीसाठी एकमेकांना मदत करताना दिसतात. या संघटित शक्तीच्या जोरावर तालुक्यात वावरणारे सावकार व त्यांना मदत करणारे पोटएजन्ट दिवसेंदिवस मुजोर बनताना दिसत आहेत, याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. सावकारीच्या पाशात अडकून अनेकजण देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर बेकायदा सावकारी मोडीत काढण्याचे एक आव्हान उभे राहिले आहे. सावकारांकडे येणारा हा पैसा नक्की कोठून येतो, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
नागरिकांनी बेकायदा सावकारांविरुध्द निर्भिडपणे पोलिसांकडे फिर्याद द्यावी. अशावेळी कर्जदाराने निनावी अर्ज दिला तरी पोलिस त्या सावकाराची चौकशी करतील. त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर करून तालुक्यातील बेकायदा सावकारीचे समूळ उच्चाटन होईल.