(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील 21 वी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुतीमंदिर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मुकुल माधव विद्यालय, GGPS हायस्कूल, थॉमस हायस्कूल, फाटक हायस्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल उद्यमनगर, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल शहर, दामले शाळा,ग्लोबल स्कूल, पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल, मानेज इंटरनॅशनल स्कूल, शिर्के हायस्कूल या शाळांमधील एकुण 230 विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कराटे दो असोसिएशन चे अध्यक्ष श्री.जावेद मिरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सचिव श्री सूरज बने , खजिनदार श्री.अरुण बेग तसेच प्रशिक्षक, पंच, व विद्यार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्पर्धेमध्ये रितेश बेग, नौशीन कापडी, प्रथम बेग, प्रेम बेग, योगेश मकवाना, तेजस जाधव आणि अयान मिरकर यांनी पंच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली आणि खेळाडूंनी आपल्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. विविध वयोगटांमध्ये झालेल्या स्पर्धकांनी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेडल्स पटकावले.
स्पर्धेचे आयोजक प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर, श्री. सूरज बने आणि श्री.अरुण बेग यांनी सांगितले की, “ही स्पर्धा केवळ पदकांसाठी नव्हती, तर खेळाडूंना शिस्त, आत्मसंयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवणारी होती.” विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा कराटे दो असोसिएशन आणि प्रशिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. पालक आणि शाळांचे सहकार्य ही स्पर्धेच्या यशामागील प्रमुख कारणे ठरली.
या स्पर्धेने रत्नागिरी जिल्ह्यातील कराटे खेळाला नवी दिशा दिली असून, युवा खेळाडूंसाठी भविष्यात आणखी संधी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शेवटी सर्व विजेत्यांचे आणि सहभागी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.