(दापोली / सुदेश तांबे)
भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मूलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यक शास्त्रातील संशोधन व नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त 200 विद्यार्थ्यांकरीता आयोजित केलेल्या इन्स्पायर कॅम्प करिता न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे विद्यालयाच्या प्रियेश प्रदीप शिंदे याची निवड करण्यात आली आहे. देशभरातील आघाडीच्या संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, संशोधक यांच्याशी संवाद करण्याची संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
कोलकाता, तिरुअनंतपुरम, आणि भोपाळ बेहरामपूर आईसर चे चेअरमन व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, डॉ. बास बापट, डॉ. सोलापूरकर, डॉ. विभाग शेवडे डॉ उमाकांत रापोल, डॉ. मनवा दिवेकर, डॉ. आचार्य ,डॉ.श्रेयस माणगावे, डॉ सुधा राजमनी, डॉ. अविनाश कुंभार, प्रोफेसर नाडकर्णी, अशोक रूपनगर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ महाराष्ट्रातील या 200 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्प करिता महाराष्ट्रातून दहावीच्या बोर्ड परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 93.6% सीबीएससी बोर्ड ९६% आयसीएस सी बोर्ड 97.83% किमान गुण असलेले व विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पात्रते करिता अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांची छाननी करून सर्वाधिक गुण असणाऱ्या 200 विद्यार्थ्यांची निवड या कॅम्प करिता करण्यात आलेली आहे.
पाच दिवसीय शिबिरामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र व अर्थसायन्स या विषयांवर हँड्सऑन ऍक्टिव्हिटी, व्याख्याने, संवाद, प्रयोग, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिर निवासी असून विद्यार्थ्यांकरीता पूर्णतः मोफत सुविधा शासनाकडून देण्यात आलेली आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा करणे, व्यवहारीक अनुभव घेणे, वैज्ञानिक संकल्पनांची सखोल माहिती घेणे, तज्ञांशी संवाद साधणे, अनेक संशोधन क्षेत्र आणि सर्वोच्च भारतीय वैज्ञानिक संस्थांमध्ये उपलब्ध संशोधन सुविधा या बद्दल माहिती घेणे, अशा संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ ,भटनागर पुरस्कार विजेते, राष्ट्रीय तसेच केंद्रीय राज्य विद्यापीठे यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 15 तज्ञांचे त्यांच्या वैज्ञानिक अनुभवांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मेरिट नुसार निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे च्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे विज्ञान शाखेचा प्रियेष शिंदे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील सदर विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 97 ℅ गुण मिळवून यशस्वी झालेला होता.
व्ही एस याच्या निवडीकरिता समन्वयक सुषमा केणी डॉ. योगेश कोळी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले प्रियेश ची निवड झाल्याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ जयवंत जालगावकर मुख्याध्यापक संदेश राऊत मार्गदर्शक अनुराग पाणीग्रही आदींनी विशेष कौतुक केले. प्रियेश च्या निवडी बद्दल स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे